~ आमच्या चिमणीचे लग्न ~
~आमच्या चिमणिचे लग्न~
(एका सत्य घटनेवर आधारीत)
उल्हास हरी जोशी✍
एका टिपीकल, मध्यम वर्गीय, कोकणस्थ ब्राम्हण कुटुंबांत जन्मलेली चीमणी लहानपणापासुनच हुषार मुलगी म्हणुन ओळखली जात होती. तिला बहीण नाही. एक मोठा भाऊ आहे. तिचे आई वडील दोघेही नोकरी करणारे. दोघेही सरकारी नोकर. मोठा भाऊ बी.कॉम. झाला व एका को-ऑपरेटीव्ह बँकेत नोकरिला लागला. चीमणी हुशार म्हणुन इंजिनीयरींगला गेली. बी.ई. कॉम्प्युटर झाली. कॅम्पसमधेच तिला इन्फोसीस मधे जॉब मिळाला. चांगले 4 लाखांचे पॅकेज मिळाले. तिचे आई वडील व भाऊ या तिघांच्या पगाराची बेरीज सुद्धा एवढी येत नव्हती. वयाच्या 22 व्या वर्षी तिचा जॉब सुरु झाला. तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी स्थळे बघायला सुरवात केली. मुलगा कोकणस्थ ब्राम्हणच हवा, इंजिनीयरच हवा, आय.टी. किंवा सॉफ्टवेअर मधलाच हवा या ‘च’ अटिंनी मुले बघायला सुरवात झाली. पहिलेच स्थळ सांगुन आले ते त्यांच्या ‘च’ च्या अटींमधे फिट्ट बसणारे होते. मुलगा कोकणस्थ ब्राम्हण होता. इंजिनीयर होता. आय टी मधला होता. 6 लाखाचे पॅकेज असलेला होता. देखणा व रुबाबदार होता,
पण....
पण....
या ‘पण’ नेच सगळा घोटाळा केला.
मुलाचे वय होते 27 तर मुलिचे वय 22. वयामधे 5 वर्षांचे अंतर. चीमणिच्या आईला हे वयातील अंतर जास्त वाटले. तिच्या मते मुलाच्या व मुलिच्या वयामधे 2 ते 3 वर्षांपेक्षा जास्त अंतर नको. दुसरी मुले बघु. ‘क्षमस्व’ म्हणुन मुलाला नकार कळवण्यात आला. मुलगी बी.ई. आहे तर मुलगा तिच्यापेक्षा जास्त शिकलेला हवा. नवर्याचे शिक्षण हे बायकोच्या शिक्षणापेक्षा जास्त असले पाहिजे असे चीमणिच्या आईचे ठाम मत होते. त्यामुळे मुलगा जास्त शिकलेला म्हणजे एम.ई., एम.टेक., एम.एस. किंवा पी.एचडी. झालेलाच असला पाहिजे अशी नवीन अट ‘ऍड’ झाली. त्या दृष्टीने मुले बघायला सुरवात झाली. पण भारतात अशी मुले कमी असतात. परदेशात अशी मुले पुष्कळ असतात. त्यामुळे परदेशातील एक दोन मुले सांगुन आली. पण ‘मुलगा परदेशातील नको’ अशी अजुन एक नवीन अट लावली गेली. भारतातील जी मुले सांगुन आली ती वयाने जास्त, जाड भिंगांचा चष्मा लावणारी, टक्कल पडु लागलेली, प्रौढ दिसणारी अशी होती. चिमणी दिसायला सुरेख नसली तरी नाकी-डोळी नीटस होती. स्मार्ट होती. तिची पर्सनॅलिटी बर्याेपैकी इंप्रेसीव्ह होती. तिला काही ती मुले पसंत पडेनात. मग एक नवा खेळ सुरु झाला. जी मुले चिमणीला पसंत पडत त्यांना चिमणी पसंत पडत नसे. आणि ज्या मुलांना चिमणी पसंत पडत असे ती मुले चीमणीला पसंत पडत नसत.
या खेळात चीमणीचे वय वाढत चालले. तिला 26 वे वर्ष लागले. अजुन हात पिवळे होत नव्हते. त्यामुळे थोडे कॉप्रोमाईज करुन ‘ बी.ई. ला बी.ई. चालेल’ अशी अट शिथील करण्यात आली. पण चार वर्षांच्या जॉबमधे चीमणीचे सॅलरी पॅकेज 7 लाखांच्या घरात पोचले होते. सांगुन येणार्याी मुलांचे सॅलरी पॅकेज त्यापेक्षा कितीतरी कमी होते. ‘नवर्या चा पगार हा बायकोपेक्षा जास्त असायला पाहिजे’ या चीमणीच्या नवीन अटीत ती मुले बसत नव्हती. बिझिनेस करणारी व चीमणीपोक्षा जास्त इंन्कम कमावणारी दोन एक मुले सांगुन आली. पण मुलगा बिझिनेस करतो, नोकरी करत नाही म्हणुन सरळ नकार कळवण्यात आला.
चीमणीचे वय 28 झाले आणि एक मोठ्ठा टर्नींग पॉइंट आला. चीमणीला सहा महिन्यांसाठी प्रॉजेक्टसाठी म्हणुन अमेरिकेला पाठवले ती आता तिकडचीच बनली. 6 वर्षे झाली ती तिकडेच आहे. ‘परदेशातील मुलगा नको’ ही अट आता बदलली आहे. पण आता उलटी गंगा वाहु लागली आहे. चीमणीचे आता वय वाढले. ती प्रौढ दिसु लागली. ओढुन ताणुन ती यंग दिसायचा प्रयत्न करत असली तरी ते ओळखु येते. परदेशातील पाहिलेली बहुतेक मुले वयाच्या 35 शीतली, डायव्होर्स झालेली किंवा काही वाईट व्यसने असलेली निघाली. तर भारतातील मुले आता चक्क नकार देतात.
आता अटी बर्यासच शिथील झाल्या आहेत. आता फक्त कोकणस्थ ब्राम्हणाऐवजी कोणताही ब्राम्हण मुलगा चालेल (पण तो मराठी असलाच पाहिजे). बी.ई. ऐवजी एमसीए किंवा एमसीएम असला तरी चालेल. त्याचा पगार कमी असला तरी हरकत नाही.
पण स्टील देअर ईज नो लक!
चिमणिच्या आईवडिलांनी आता ज्योतिषांचे ऊंबरठे झीजवायला सुरवात केली आहे. सगळ्या प्रख्यात ज्योतिषांना चीमणीची पत्रीका दाखवुन झाली. चीमणीला मंगळ नसताना कोणता पाप ग्रह तिच्या लग्नाआड येतो आहे हे पहाण्यासाठी! पण प्रत्येक ज्योतिषी असा कोणताही पाप ग्राह आड येत नाही. येत्या कांही महिन्यांत नक्की विवाह योग आहे म्हणुन भरघोस आश्वासने देत भरपुर फी उकळत आहे.
चीमणीने स्वतःचे लग्न स्वतः ठरवावे म्हणुन स्वातंत्रय देऊन पाहिले. तु कोणाशिही लग्न कर. फक्त तो मुलगा हवा एवढीच अट टाकली. पण लव्ह मॅरेज करण्याचे धाडस चीमणीत नाही.
चीमणीला आता 32 वे संपुन 33 वे लागले. अजुनही चीमणीसाठी मुले पहाणे चालुच आहे. देवाने मुळात माणसांच्या दोनच जाती निर्माण केल्या. स्त्री आणि पुरुष. पण माणसांमधे जाती जमाती, उप जाती निर्माण केल्या त्या माणसानेच. संस्कृतिच्या नांवाखाली या मानव निर्मीत जाती, जमाती, उपजाती पोसल्या गेल्या आहेत. त्यामधेच माणसे फसली आहेत, रुतुन बसली आहेत. त्यांच्या जंजळात अडकुन पडली आहेत. संस्कृतिचा व धर्माचा ‘ओव्हरडोस’ असलेल्या आपल्या भारत देशांत अशा लेकांचे प्रमाण भरपुर आहे. तसेच अपेक्षा व अटी यात गोंधळ होत असतो. अपेक्षा ( Expectations ) म्हटले की त्यात थोडाफार तरी तडजोडिला वाव असतो. पण अटी ( Conditions ) म्हटले की त्यांत तडजोडीस कुठलाच वाव नसतो. चीमणीच्या आई वडिलांनी आधी अपेक्षांच्या अटी केल्या. मग अटिंचे रुपांतर परत अपेक्षांमधे केले पण तोपर्यंत चीमणीचे लग्नाचे वय नीघुन गेले होते. अपेक्षा व अटींचा हा खेळ अनेक चीमणा चीमणींच्या आयुष्यात चालुच असतो.
केवळ वय जास्त म्हणुन पहिले स्थळ नाकारले याचा पश्चात्ताप आता चीमणीच्या आई वडीलांना होतो आहे. पण आता त्याचा काय उपयोग? बैल गेला आणि झोपा गेला अशी त्यांची अवस्था आहे.
हल्ली समाजामधे अशा चिमणा-चीमण्यांची संख्या वाढत चालली आहे ही खरी चिंतेची बाब आहे.
आपण चीमणीच्या कॅटेगरीत यायचे किंवा नाही
आपण चीमणीच्या कॅटेगरीत यायचे किंवा नाही
हे हल्लिच्या उपवर तरुणिंनी व
त्यांच्या आई वडिलांनीच ठरवायला हवे नाही कां?
तुम्हाला काय वाटते?
( पुण्याहुन प्रसिद्ध होणार्या 'उत्तम कथा' या मासीकाच्या एप्रील 2013 च्या अंकात हा लेख पसिद्ध झाला आहे.)
चिमणी आता 40 वर्षांची आहे पण..
Still there is no luck...