विवाहाच्या बंधनातील ‘सप्तपदी’ हा विधी खूप महत्त्वाचा असतो. मला वाटतं जुन्या काळातल्या स्त्रिया लग्नाच्या वेळी वयाने लहान होत्या. शिक्षण जेमतेम झालेलं मग तिला जो उपदेश सप्तपदीतून दिला जात असे तो अर्थपूर्ण होताच. पण आपण आजच्या बदलत्या काळानुसार मुलीला सप्तपदीची नवी सूत्रं दिली तर ती तिला निश्चित उपयोगी पडतील असं वाटतं. 1) हे सौभाग्याकांक्षिणी! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्यं प्राप्त केली आहेस. तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचं बळ आहे; पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस. 2) हे रमणी, तुझं हे दुसरं पाऊल आहे, त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला सार्या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे ‘आनंदी जीवन’ हे सूत्र लक्षात ठेव. 3) हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासु-सासर्यांवर आई-वडिलांसारखं प्रेम करण्याचं ...