जागतिक पर्यावरण दिन त्या निमित्त
भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व असून, त्याचा आदर केला गेला आहे. पर्वत, नद्या, झाडे, सूर्य-चंद्र आणि पंचतत्त्वे या सर्वांची पूजा केली गेली आहे.
पंचतत्त्वातील पाचही तत्त्वे एकमेकांशी घट्ट बांधली गेली आहेत. त्यातील एक प्रदूषित झाल्यास त्याचा परिणाम इतर चारांवरही होतो. त्यामुळे मानवाने आपल्या कृतीतून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेत सर्व उत्सव साजरे करायला हवेत.
खरेतर जगातील सर्वच प्राचीन संस्कृतीमध्ये अशाच प्रकारे निसर्गाबद्दल आदरभाव दिसून येतो. आज मानवी मनाला तणावमुक्त करून, दूर सारून हा श्रद्धाभाव परत आणण्याची तसेच पर्यावरण रक्षणात समाजाचा सहभाग मिळवण्याची आणि पर्यावरणाबद्दल त्यांना जाणीव करून देण्याची गरज आहे.
पर्यावरण आणि विवाह सोहळे
विवाह सोहळा… म्हणजे पारंपरिक विधी, थाटमाट… अंगतपंगत… रुखवत… मंगल अक्षता… या सगळ्यांची रेलचेल… आजच्या महागाईच्या काळातही अशा पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर विधी आनंदाने पार पडतात… वधु-वरांसह पै पाहुणे सगळेच जण यामध्ये आनंदाने सहभागी होतात, मात्र सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या युगात या विधींच्या माध्यमातून पर्यावरणाची जपणूक करता आली तर ? … हा विचार कोणीही करत नाही, मात्र निसर्गाचे आणि धार्मिक विधींसाठी लागणाऱया वस्तूंची जपणूक करण्याचा मार्गाने वाटचाल ‘इको फ्रेंडली विवाह’च्या माध्यमातून करता येऊ शकते.
लोकांमध्ये पर्यावरणाचे भान राखले जावे आणि भविष्यकाळाचे भान ठेवून विवाहासाठी वापरल्या जाणाऱया अक्षता, केळीची पाने, प्लास्टिकचे ग्लास, ताटे, पिशव्या इत्यादी वस्तूंची नासधूस, त्यासाठी होणारा अनाठायी खर्च टाळता यावा, या उद्देशाने इको फ्रेंडली विवाहसोहळ्याची संकल्पना लोकांमध्ये रुजू व्हायला हवी.
लग्नाच्या या समारंभात पाहुण्याच्या पाहुणचारासोबत दिखाव्याला अधिक प्राधान्य असते. केवळ एक परंपरा म्हणून लग्नाचे स्वरूप मर्यादित न राहता त्यातून संपत्तीचे प्रदर्शन कसे करता येईल याकडेही अधिक लक्ष दिले जाते. लग्नात मांडल्या जाणाऱया थाटात पर्यावरणाचे कोणतेही भान न ठेवता अनाठायी खर्च केला जातो. या गोष्टींना अशा पद्धतीने लग्न समारंभ साजरे केल्यामुळे आळा बसू शकतो.
इकोफ्रेंडली लग्नसोहळा-
लग्नसोहळ्यात अक्षतांऐवजी झेंडू, गुलाब फुलांच्या पाकळ्या वापरता येतात नंतर त्यांचे कंपोस्ट खत करता येते. विवाहाची आठवण म्हणून वृक्ष लागवड करावी. फटाके फोडून प्रदूषण वाढविण्याऐवजी ते पैसे चांगल्या कार्यास वापरावे. डीजे कर्णकर्कश बँड लावून ध्वनिप्रदूषण करण्यापेक्षा पारंपरिक विवाह गीत आणि त्यावर छान नृत्य करता येते. हवे तेव्हढेच अन्न ताटात घेऊन अन्नाची नासाडी थांबवता येते. अशा बऱ्याच प्रकारे शक्य होईल तेथे आपण विवाह सोहळ्यात होणारे पंचतत्वांचे प्रदूषण टाळू शकतो, गरज आहे फक्त आपल्या मनाच्या तयारीची आणि खंबीर निर्णयाची..
(संकलित)