जोडीदार निवडतांना..
जोडीदार निवडतांना नीट विचार करा...
साधारण वयाची पंचविशी आली की त्या मुलाला किंवा मुलीला पाहून ‘यंदा कर्तव्य आहे’ अशी शेरेबाजी सुरु होते. काही वर्षांपुर्वीपर्यंत ही वयोमर्यादा कमी असली तरी आता मात्र करिअर, सेटलमेंट अशी टार्गेट्स पुर्ण झाल्याशिवाय ती आणि तो दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढायला तयार नसतात. मात्र वयाचा ठराविक आकडा गाठल्यानंतर मात्र घरच्यांकडून ख-या अर्थाने लगीनघाई सुरु होते. अशावेळी काहीजण ‘ आमचं ठरलंय’ म्हणत कुटुंबियांसमोर प्रेमाची कबुली देत लव्ह मॅरेजच्या गटात सामील होतात, तर काहींना अद्यापही परफेक्ट जोडीदाराची प्रतिक्षा असल्याने अनेकजण कुटुंबियांसह विवाह संस्थेकडे धाव घेतात.
अर्थात लव्ह मॅरेज अस वा अरेन्ज… दोन्ही प्रकारात जोडीदाराची निवड ही महत्वाचीच असते.
प्रेमविवाहात आधी मैत्री, प्रेम, एकमेकांसह घालवलेला वेळ आणि त्यानंतर ख-या अर्थाने लग्नाचा प्रवास सुरु होतो. प्रेमविवाहाचा एक फायदा म्हणजे लग्नापुर्वी जोडीदारासोबत पुष्कळ वेळ घालवता येतो, एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी जाणता येतात. मात्र यामधील एक महत्वाचा मुद्दा असा की याप्रकारात जोडीदाराच्या निवड ही आपलीच असल्याने लग्नानंतर होणा-या कुरबुरींची जबाबदारीही केवळ त्या दोघांचीच असते.
अरेन्ज मॅरेजमध्ये जोडीदार हा संपूर्णपणे नवखा असल्याने हळूहळू त्याच्या सवयी जाणून घेता येतात. मात्र या प्रकारात संपुर्ण कुटुंबियांचा सहभाग असल्याने प्रत्येकाची पसंती, निवड यांचा विचार केला जातो. शिवाय आपल्या अटी, अपेक्षा यांचा पुरेपूर विचार करून जोडीदार निवडण्याची संधी मिळते.
अर्थात तुम्ही कोणत्याही प्रकारे लग्न जुळवा, मात्र डोळसपणे विचार करून जोडीदार निवडला गेला नाही तर मात्र आयुष्याशी राखरांगोळी होवू शकते. लग्नाला जुगार म्हणतात ते यासाठीच! एकदा जोडीदाराची निवड चुकली की केवळ तुम्हा दोघांचेच नव्हे तर दोन्ही कुटुंबियांना याचा मनस्ताप सोसावा लागतो.
भविष्यात रंगणा-या एका सुंदर डावाचा बेरंग होवू नये असं वाटत असेल तर जोडीदाराची निवड ही केवळ प्रेम, गुलाबी स्वप्न, कवी कल्पना यांच्या बळावर न करता सजगतेने करणं अपेक्षित आहे.
लग्नासाठी जोडीदाराची निवड करताना हमखास होणा-या या चुका टाळल्यात तर भविष्यात पश्चातापाची वेळच येणार नाही.
१. छोट्या गोष्टींमुळे नकार
अरेन्ज मॅरेज प्रकारात ही बाब अत्यंत सामान्य असते. नातेवाईकांच्या परिचयातून किंवा विवाह नोंदणी कार्यालयातून एखादं स्थळ आलं, की कुटुंबियांकडून त्याची माहिती मुलगा, किंवा मुलीला दिली जाते. मात्र यावेळी फोटोतील त्या मुलाची किंवा मुलीच्या नकारात्मक बाजुंना अधोरेखित करत थेट नकार देण्याकडे अनेकांचा कल असतो. यामध्ये रंग, रुप, उंची अशा प्राथमिक स्तरावरच नकार देण्याची घाई केली जाते आणि यामुळेच अनेक चांगल्या जोडीदाराला तुम्ही मुकण्याची शक्यता असते.
नकाराची घाई करण्यापेक्षा सकारात्मत विचार करून आधी तिला/त्याला भेटा. प्रत्यक्ष भेटीतून त्या व्यक्तीला जाणून घ्या आणि त्यानंतर तुमचं मत ठरवा.
२. मित्रमैत्रिणींचा हस्तक्षेप
हल्ली प्रत्येक बाबींमध्ये मित्रमैत्रिणींचा हस्तक्षेप वाढल्याची तक्रार पालकांकडून केली जाते, ती काहीअंशी योग्य आहे. शॉपिंग, पिकनीक, ऑफिसमधील गॉसिप असं सगळंकाही शेअर करताना लग्नासारखा महत्वाचा निर्णय मात्र मित्रांवर अवलंबून असू नये. अनेकदा जोडीदाराची निवड करतानाही मित्रमैत्रिणींचा सल्ला घेतला जातो. यामध्ये प्रत्येकाची मतं, विचार, अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने प्रत्येकाकडून मिळणारा सल्लाही वेगळा असतो.
लग्न ही तुमची वैयक्तिक बाब असल्याने तुम्हाला आवडणा-या जोडीदाराचीच निवड होणं गरजेचं आहे. इतरांकडून विनाकारण सल्ले घेतल्यास त्यात चूक होण्याची शक्यता असते.
३. होकार द्यायला घाई
अनेकजण नकार द्यायला वेळ लावतात तर काहीजण होकाराची घाई करतात. मात्र या दोन्हीमुळे निवडीत चुक करण्याची शक्यता असते. एखादं चांगलं स्थळ आलं, आणि त्यातील मुलगा/मुलगी पहिल्या भेटीतच मनात भरली तर मग विचारायलाच नको. ‘उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग’ म्हणणा-यांनी कितीही चिडवलं तरी कधी एकदा तिच्याशीच/त्याच्याशीच लग्न होतंय याची घाई केली जाते.
मात्र अतिघाई चांगली नाही हे लक्षात ठेवा. घाईघाईत होकार दिल्यामुळे अनेकदा जोडीदाराबद्दलची पुरेशी माहिती घेता येत नाही.
भावी जोडीदाराचा स्वभाव, आवड, पुर्वायुष्य यांची माहिती करून घ्या, एकमेकांना वेळ द्या, चर्चा करा आणि मग सावकाश निर्णय घ्या.
४. आर्थिक अपेक्षांची चर्चा नं होणं
आयुष्य म्हणजे परिकथा नव्हे, लग्न ही सुंदर, हवीहवीशी गोष्ट असली तरी त्यासोबत अनेक जबाबदा-याही येतात.
कुटुंब वाढताना खर्च वाढत असल्याने त्याची तरतुद आधीच होणं गरजेचं असतं. हल्ली नवरा-बायको दोघेही कमवत असल्याने खर्चाची जबाबदारी दोघांची असते.
त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्यापुर्वीच दोघांनी याविषयावर मनमोकळा संवाद साधला पाहिजे. दोघांची मिळकत, घरासाठी खर्च करण्याची तयारी, आर्थिक स्वप्न, सेव्हिंग या विषयावर चर्चा झाली नाही तर हेच मुद्दे भविष्यात घटस्फोटाचं कारण ठरतात हे विसरू नका.
५. पुर्वायुष्याचा पगडा
पुर्वी आयुष्यात घडून गेलेल्या घटना, अनुभव यांतून बोध घेणं गरजेचं असलं तरी त्यावर विसंबून राहू नका.
अनेकदा आयुष्यात प्रेमाचे बरेवाईट अनुभ येतात, अनेकांचं प्रेम अयशस्वी होतं, मात्र त्यावरून इतरांची परिक्षा करू नका. सध्या ज्या जोडीदाराची निवड करत आहात तिच्याशी मनमोकळेपणाने बोला, मात्र पुर्वायुष्यातील प्रियकर/प्रेयसी यांची तुलना करू नका.
नवी सुरवात करताना सकारात्मक विचार करा.
६. मूल कधी व्हावं याचा आपसात विचार नं करणं
मुलं कधी व्हावं हा सर्वस्वी दाम्पत्याचा निर्णय असला तरी हल्ली अनेक तरुणतरुणी मुल नकोचं असं ठामपणे सांगतात. याबाबतची कारण कोणतीही असली तरी त्यांचा निर्णय लग्नापुर्वीच ठरलेला असतो. अशावेळी हा निर्णय लग्न होण्यापुर्वीच जोडीदाराला सांगा, यामध्ये दोघांची मतमतांतरे असली तरी वेळीच त्यावर चर्चा होणं चांगलं! अन्यथा हा मुद्दा लग्नानंतर वादाचं मुख्य कारण होतं.
मुल हवं की नको? हवं असल्यास किती वर्षांनी? य़ा प्रश्नांची उत्तरं शोधा, चर्चा करा मगच लग्नाचा निर्णय घ्या.
७. लपवाछपवी
जोडीदारासमोर आपली प्रतिमा चांगली व्हावी यासाठी हरत-हेचे प्रयत्न केले जात असले तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारची लपवाछपवी नको. आपलं पुर्वायुष्य, त्यातील महत्वाच्या व्यक्ती, चांगले वाईट अनुभव, प्रेमप्रकरणं यांती खरी माहिती वेळीच भावी जोडीदाराला सांगा.
जोडीदार नकार देईल या भितीने एखादी माहिती लपवली तरी भविष्यात ही माहिती समोर आल्यास जोडीदार कायमचा दूर जाईल हे विसरू नका.
८. पालकांचा दबाव
आई वडिलांची इच्छा म्हणून लग्न करताय? तुमच्या इच्छा, अपेक्षा यांचा विचार न करता जोडीदार निवडताय? मग ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकेल.
लग्नाच्या प्रक्रियेत दोन कुटुंबांचा सहभाग असला तरी त्या दोघांना एकमेकांसोबत आयुष्य घालवायचं असतं. अशावेळी दोघांची पसंती सर्वात महत्वाची आहे. केवळ पालकांच्या इच्छेखातर किंवा त्यांच्या पसंतीवर अवलंबून रहात लग्न केलं तर कालांतराने तुम्हाला याचा पश्चाताप होवू शकतो आणि लग्न ही तडजोड वाटु शकते.
९. तिच्या/त्याच्या यशावर भाळणे
यशस्वी, लाखांचे आकडे असणारा पगार, अनेक सुविधा असा परफेक्ट पार्टनर निवडणार असाल तरी त्या व्यक्तीचा स्वभाव जाणणे गरजेचे आहे.
जोडीदार केवळ यशस्वी आहे, तिच्याशी/त्याच्याशी लग्न करून आपल्याला आर्थिक फायदा होईल, आपली लाईफस्टाईल अधिक चांगली होईल असा संकुचित विचार करणं थांबवा.
लग्नानंतर केवळ पैसा हे सर्वस्व नसून जोडीदाराचे गुण, स्वभाव, परस्परांचे नाते या बाबी महत्वाच्या असतात. केवळ पैशाने लग्न टिकवता येत नाही हे लक्षात ठेवा.
१०. शैक्षणिक पात्रता
जोडीदार निवडताना त्यांची शैक्षणिक पात्रता बघितलीच पाहिजे. परंतु, शैक्षणिक पात्रता ही केवळ डिग्रीच्या कागदाने ठरत नाही. तो कागद महत्त्वाचा असतोच; पण त्याहीपेक्षा त्या व्यक्तीची आकलनशक्ती, पुढे जाण्याची जिद्द, काम करण्याची चिकाटी हे गुण जास्त महत्त्वाचे आहेत. भावी जोडीदाराकडे हे गुण असतील तर नक्कीच त्या व्यक्तीचा भविष्यकाळ चांगलाच असेल. ती व्यक्ती पुढे जाऊन आपल्या आयुष्यात नक्कीच चांगलं काम करू शकेल, हा विश्वास येतो. मग सद्य परिस्थितीत ती व्यक्ती खूप श्रीमंत नसली, तरी आपली साथ त्याला मिळाल्यास नक्कीच पुढील आयुष्यात तो आपल्याला सुखी ठेवू शकेल.
भौतिक ऐश्वर्य हे कायमस्वरूपी नसते. बऱ्याच वेळेला ही श्रीमंती वडिलोपार्जित असते. आपली शैक्षणिक पात्रता मात्र आपल्याबरोबर कायमस्वरूपी टिकते. एखादी व्यक्ती पैशाने श्रीमंत नसली; परंतु तिच्यामध्ये अथक परिश्रम करायची तयारी असेल, तर नक्कीच ती व्यक्ती पुढे जाऊन मोठे नाव कमावते. त्यामुळे भावी जोडीदार निवडताना त्याच्यामध्ये हे गुण आहेत का? हे तपासून पाहावे. तसेच, आपली साथ मिळाल्यावर आपण यशाची उत्तुंग शिखरे गाठू, हा विश्वास एकमेकांना यायला पाहिजे. अशा समजुतींवर जडलेले नाते हे चिरकाल टिकते
जोडीदाराची निवड ही प्रत्येकासाठी खास आणि महत्वाची असते, अर्थात त्याबाबत प्रत्येकाचा अनुभवही वेगळा असतो. मात्र अनेक दाम्पत्यांमध्ये निवडीबाबत होणा-या या चुका मात्र कॉमन असतात. या चुका वेळीच सुधारल्या नाहीत तर नंतर घटस्फोट किंवा तडजोड करत एकमेकांसोबत रहावं लागणं अशा कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे वेळ निघून जाण्यापुर्वीच सावध व्हा..
(संकलित)